भारताचे संविधान

 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन

या पुस्तकाचे समीक्षात्मक परीक्षण
हे पुस्तक एप्रिल २०२६ मध्ये प्रकाशित झाले असून, १३६ पृष्ठांचे आणि ₹२५०/- किमतीचे आहे.
प्रकाशक: विवेक पुस्तक प्रकाशित, हिंन्दुस्थान प्रकाशन संस्था.
लेखक : रमेश पतंगे

भारतीय संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून घेण्यासाठी केवळ त्यांना ‘संविधानाचे शिल्पकार’ म्हणून गौरवणे पुरेसे नाही; त्यांच्या मागे असलेले राजकीय, सामाजिक आणि तात्त्विक चिंतन समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. रमेश पतंगे यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ या पुस्तकाचा मुख्य प्रयत्न याच दिशेने जातो. लेखकाच्या मते, संविधान हे केवळ कायद्यांचे संकलन नसून सामाजिक परिवर्तनाचे आणि सत्तेवर अंकुश ठेवण्याचे प्रभावी साधन आहे.
संविधाननिर्मितीची पार्श्वभूमी-
पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखक थेट आंबेडकरांच्या विचारांकडे न जाता आधी संविधाननिर्मितीची प्रक्रिया आणि तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करतात. अमेरिकन संविधान, ब्रिटिश संसदीय परंपरा आणि भारतीय संविधानसभा यांचा संदर्भ देत भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, हे समजावून सांगण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे.
संविधानसभा- संविधान ग्रंथस्वरूपात येण्यासाठी महत्वाच्या कायदेतज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यापैकी कायदेतज्ञ बी. एन. राऊ यांनी तयार केलेला प्रारूप मसुदा आणि त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून आंबेडकरांनी केलेले काम यावरही पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे.
यामुळेच आंबेडकरांचे योगदान एखाद्या व्यक्तीपुरते मर्यादित न ठेवता संविधाननिर्मितीच्या व्यापक प्रक्रियेच्या संदर्भात पाहण्याची संधी वाचकाला मिळते.
आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन
पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. आंबेडकरांचे संविधानाविषयीचे चिंतन उल्लेखनीय आहे. संविधानाची निर्मिती करताना समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, मूलभूत अधिकार, लोकशाही आणि राज्यसत्तेवर नियंत्रण या मूल्यांकडे अभ्यासक या नात्याने आंबेडकरांनी कशा दृष्टीने पाहिले, याचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखक करतात.
विशेषतः संविधान हे राजसत्तेला अनिर्बंध अधिकार देणारे साधन नसून तिच्यावर घटनात्मक मर्यादा घालणारे माध्यम आहे, ही भूमिका पुस्तकात अधोरेखित होते. लेखकाने आंबेडकरांच्या संविधानविषयक विचारांना सामाजिक क्रांतीच्या संदर्भात मांडले आहे.

पुस्तकाचे बलस्थान-
या पुस्तकाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे कठीण घटनात्मक विषय सामान्य वाचकाला समजेल अशा पद्धतीने मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न केला गेला आहे. लेखक स्वतः, हे पुस्तक सर्वसामान्य नागरिक तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिल्याचे सांगतात.
दुसरे महत्त्वाचे बलस्थान म्हणजे, संविधानसभेतील चर्चेचे महत्त्व अधोरेखित करणे. लेखक रमेश पतंगे यांच्या मांडणीनुसार, संविधानसभा ही केवळ राजकीय वादविवादाचे व्यासपीठ नव्हती; विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करणारी आणि राष्ट्रीय प्रज्ञेचे प्रतिनिधित्व करणारी संस्था होती.

 पुस्तकाचे परीक्षण करताना त्यांच्या वैचारिक भूमिकेचाही विचार करणे अत्यावश्यक आहे. पतंगे हे दीर्घकाळ सामाजिक-वैचारिक लेखन करणारे लेखक असून त्यांच्या मांडणीवर विशिष्ट राष्ट्रवादी वैचारिक दृष्टिकोनाचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे हे पुस्तक आंबेडकरांच्या विचारांचे पूर्णतः तटस्थ किंवा सर्वसमावेशक शैक्षणिक विश्लेषण म्हणून वाचण्याऐवजी एका विशिष्ट वैचारिक चौकटीतून केलेले आंबेडकरांच्या जाज्वल्य विचारांचे पुनर्वाचन म्हणून वाचणे अधिक योग्य ठरेल.
आंबेडकरांच्या जातिव्यवस्थेविषयीच्या मूलभूत भूमिकेचा, हिंदू सामाजिक व्यवस्थेवरील त्यांची चिकित्सा, अल्पसंख्याकांचे प्रश्न, प्रतिनिधित्व, बौद्ध धर्माकडे त्यांचा झालेला प्रवास अशा व्यापक विचारविश्वाचा अधिक सखोल संबंध संविधानविषयक चिंतनाशी जोडला गेल्याने पुस्तकाची व्याप्ती आणखी समृद्ध झाली आहे.तसेच, संविधानाच्या निर्मितीत आंबेडकरांचे योगदान निर्विवादपणे महत्त्वाचे असले तरी संविधान हे केवळ एका व्यक्तीचे निर्माणकार्य नव्हते. संविधानसभा, विविध समित्या, बी. एन. राऊ, के. एम. मुन्शी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डाॅ.राजेंद्र प्रसाद आणि इतर अनेक सदस्यांचे योगदानही तितक्याच चिकित्सकपणे समोर आणणे आवश्यक आहे. पुस्तकात या प्रक्रियेचा संदर्भ आहे; मात्र आंबेडकरकेंद्री मांडणीमुळे काही वेळा व्यापक सामूहिक प्रक्रिया दुय्यम ठरते.
आजच्या काळातील महत्त्व
आज संविधानाविषयी सार्वजनिक चर्चेत अनेकदा संविधानात असणाऱ्या कलमांपेक्षा राजकीय दावे, गैरसमज या विषयीची माहिती लेखकाने पुस्तकात मांडली आहे. संविधानाची निर्मिती, त्यामागील विचार आणि आंबेडकरांचे घटनात्मक तत्त्वज्ञान सामान्य वाचकांपर्यंत पोहोचविणारे हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरते.
लेखकाने विशेषतः कलम २१ आणि मूलभूत अधिकारांच्या स्वरूपाकडे लक्ष वेधले आहे. मूलभूत अधिकार हे निरंकुश नसून त्यांना घटनात्मक मर्यादा आहेत, ही बाबही पुस्तकाच्या विवेचनात ठळकपणे मांडली आहे.

निष्कर्ष-
एकूणात, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ हे आंबेडकरांच्या घटनात्मक भूमिकेची प्राथमिक ओळख करून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी उपयुक्त पुस्तक आहे, हे  निश्चित !संविधानसभा, संविधाननिर्मितीची प्रक्रिया आणि आंबेडकरांचे योगदान यांचा सुसंगत परिचय हे त्याचे महत्त्वाचे योगदान म्हणता येईल.
मात्र, आंबेडकरांचे संपूर्ण राजकीय-सामाजिक तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी हे पुस्तक एकमेव संदर्भग्रंथ मानता येणार नाही. त्याबरोबर आंबेडकरांचे मूळ लेखन आणि विविध विद्वानांचे चिकित्सक अभ्यास वाचणे आवश्यक ठरेल. त्यामुळे या पुस्तकाचे मूल्यांकन करताना त्याची वैचारिक भूमिका लक्षात घेऊन, त्याला ‘आंबेडकरांच्या संवैधानिक विचारांचे एका विशिष्ट दृष्टिकोनातून केलेले सुबोध विवेचन’ असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.
 या पुस्तकातून विषयाची उपयुक्तता  अत्यंत चांगल्याप्रकारे, सामान्य वाचकांसाठी  शैक्षणिक/चिकित्सक रितीने सर्वसमावेशपणे
पुस्तकात केली आहे.

 श्री प्रकाश वैद्य
पालघर जिल्हा मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष