पुस्तकाची किंमत 250/-
स्तकांच्या बाजारात नरेंद्रभाई मोदी यांच्याबद्दल इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषांत अनेक पुस्तके आहेत. त्यामुळे नवीन लिहिण्यासारखे काय आहे, असा प्रश्न सहजपणे निर्माण होतो. पण नरेंद्रभाईंचे चरित्र मला लिहायचे नव्हते, अथवा त्यांच्या दहा वर्षांच्या पंतप्रधान कारकिर्दीचा आढावाही मला घ्यायचा नव्हता. एक विषय माझ्या मनात वर्षभर घोळत राहिला, तो म्हणजे नरेंद मोदी हे ‘ दि गेम चेंजर’ आहेत. मराठीत त्याचे भाषांतर करायचे, तर ‘खेळ बदलणारा राजनेता’ असा होतो. खेळाचे नियम त्यांनी बदलले नाहीत. नियम बदलले तर खेळ तोच राहतो. नवीन खेळ सुरू केला की, नवीन नियम सुरू होतात. त्याला दुसर्या भाषेत ‘परिवर्तन’ असे म्हणतात. हे परिवर्तन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
त्यांच्या परिवर्तनातील मुख्य युद्धभूमी राजकीय आहे. म्हणून ते राजकीय परिवर्तनाचे शिल्पकार आहेत. त्याची वैचारिक मांडणी करावी, असा विषय माझ्या मनात आला. नरेंद्र मोदी यांच्यावर उपलब्ध असलेली अनेक पुस्तके गेली तीन-चार वर्षे माझ्या वाचनात आली. बहुतेक सर्व पुस्तकांचे लेखक जाणकार आहेत, अभ्यासू आहेत, पुस्तक लिहिण्यासाठी जे कष्ट करावे लागतात, ते सर्व त्यांनी केलेले आहेत. या सर्व पुस्तकांच्या वाचनातून माहिती मिळत जाते. नरेंद्रभाई मोदी यांनी सुरू केलेल्या योजना, त्यांची नावे, त्यांची आकडेवारी सर्व मिळत जाते. परंतु या पुस्तकांच्या वाचनाने माझे वैचारिक समाधान झाले नाही. एक महत्त्वाचा विषय अनुत्तरित राहिला, तो विषय म्हणजे ‘नरेंद्र मोदी यांनी देशात कोणते जबरदस्त वैचारिक परिवर्तन घडवून आणले?’ हा आहे.
मी ज्या विचारधारेत वाढलो, त्या विचारधारेचा एक संकेत आहे की, कोणाही व्यक्तीचा फार उदोउदो करू नये. आपण विचारनिष्ठ लोक आहोत, व्यक्तिनिष्ठ नव्हे. नरेंद्रभाई मोदी यांची अफाट स्तुती करण्याचे मला काही कारण नाही. परंतु विचारनिष्ठेचा विषय केला, तर नरेंद्रभाई मोदी यांनी कोणत्या विचारधारेचा आग्रह धरला, कोणते परिवर्तन सुरू केले, ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. ‘विचार हे कायम असतात, व्यक्ती नश्वर असते’ हे सूत्र लक्षात घेऊन आणि पुस्तकाच्या शीर्षकाचाच वापर करून सांगायचे, तर मोदींनी कोणता ‘गेम’ बदलला आहे आणि कोणता नवीन गेम सुरू केला आहे, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरणार आहे.
देशाचा राजकीय खेळ बदलण्यापूर्वी कोणता खेळ चालू होता? असा स्वाभाविक प्रश्न होतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच या खेळाची सुरुवात झाली. त्याला नावच द्यायचे झाले, तर भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचा हा खेळ आहे. या खेळाचा पहिला सिद्धान्त असा की, 1947 साली नवीन राष्ट्राचा उदय होत आहे. या नवीन राष्ट्राची जडणघडण आपल्याला करायची आहे. दुसरा विषय आला तो म्हणजे, नवीन राष्ट्राच्या जडणघडणीचे नियम ठरविण्याचा, त्याची चौकट ठरविण्यात आली. त्याचे शब्द असे आहेत – सेक्युलॅरिझम, सोशॅलिझम, डेमॉक्रसी, अलिप्ततावाद. मराठी शब्द असे आहेत – धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही आणि अलिप्ततावाद.
पं. जवाहरलाल नेहरू हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असणारे लोकप्रिय नेते होते. स्वातंत्र्यचळवळीच्या आंदोलनात जवळजवळ 11 वर्षे त्यांनी तुरुंगात काढली. महात्मा गांधीजींच्या अहिंसक चळवळीवर त्यांचा विश्वास होता, ते गांधीशरण होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते महात्मा गांधीजींचे अत्यंत आवडते नेते होते. महात्मा गांधीजींनी त्यांना आपला राजकीय वारस केले. काँगे्रस पक्षाची आणि देशाची इच्छा अशी होती की, सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले पंतप्रधान व्हावेत. काँगे्रस पक्षाने त्यांचीच निवड केली होती. महात्मा गांधीजींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना आपले नाव मागे घ्यायला सांगितले आणि पं. नेहरूंचा मार्ग मोकळा केला.
पं. नेहरू 17 वर्षे देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांची पंतप्रधानपदाची कारकिर्द अनेक चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर आपल्या देशापुढे लोकविलक्षण समस्या निर्माण करणारे असंख्य प्रश्न पं. नेहरूंनी निर्माण करून ठेवले. देशाला पिढ्यान्पिढ्या त्याची किंमत द्यावी लागली. पं. नेहरूंनी निर्माण केलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची माहिती ‘गेम चेंजर : नरेंद्र मोदी’ या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल.
माधवराव गोडबोले यांचे ‘दि गॉड हू फेल्ड’ हे पं. नेहरूंच्या कारकिर्दीवरील पुस्तक आहे. त्याचा उल्लेख या पुस्तकातील काही प्रकरणांमध्ये केलेला आहे. पं. नेहरूंऐवजी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते, तर काय घडले असते? ते त्यांनी विस्तृतपणे मांडले आहे. यात महत्त्वाचे म्हणजे –
* धर्मनिरपेक्षतावादासंदर्भातील दृष्टीकोन पूर्णपणे भिन्न असता. नेहरूंप्रमाणेच पटेलही धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने होते. पण तो अधिक संतुलित धर्मनिरपेक्षतावाद असता आणि मुसलमानांना खूश करण्याच्या बाजूने धर्मनिरपेक्षतावाद झुकलेला नसता.
* नेहरू पंतप्रधान असताना माउंटबॅटन यांना जो फायदा घेता आला, तो त्यांना घेता आला नसता.
* शेख अब्दुल्लांनी भारताशी फितुरी करण्याची हिंमतच केली नसती. जम्मू आणि काश्मीर भारतात पूर्णपणे विलीन झाले असते आणि ‘कलम 370’ हा जो वादाचा मुद्दा झाला होता, त्याची आवश्यकताच भासली नसती.
* भारताच्या परराष्ट्र धोरणात आमूलाग्र बदल दिसला असता. पंचशील धोरण, नि:शस्त्रीकरण, अलिप्ततावाद हा नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचा गाभा होता. पण पटेलांनी ही सर्व धोरणे निश्चितच केली नसती.
देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कायम मजबूत स्थान निश्चित करून मगच वाद घालण्याची पटेलांची भूमिका होती. मजबूत देशालाच जगात आदर मिळू शकतो, अशी त्यांची धारणा होती. भारताला कदाचित नेहरूंसारखे भुरळ घालणारे नेतृत्व मिळाले नसते. पण भारत इतका मजबूत झाला असता की, कदाचित तशा भुरळ घालणार्या व्यक्तिमत्त्वाची उणीवच भासली नसती.
आज माधवराव गोडबोले हयात नाहीत, त्याचप्रमाणे ‘370’ कलमाचे दफन झाले आहे. नेहरूंऐवजी पटेल असते तर काय झाले असते, हे माधवराव गोडबोले यांनी विविध प्रकारे सांगितले, त्यातील निवडक भाग वर दिला आहे. त्यावर भाष्य करायचे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडून अपेक्षित असलेले कार्य करताना दिसतात. गांधीजींनी सरदार पटेल यांना संधी नाकारली. भारतीय जनतेने नरेंद्र मोदी यांना ही संधी दिली. नरेंद्र मोदी यांच्यावरील अनेक पुस्तकांतून पटेलांना नाकारलेले कार्य (?) मोदींनी कसे केले आहे, याची झलक वाचायला मिळेल.
पं. नेहरू यांच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत ‘इकोसिस्टिम’ तयार झाली. ‘इकोसिस्टिम’ म्हणजे काय? ज्याप्रमाणे पर्यावरणाची एक शृंखला असते, तशी एक राजकीय-बौद्धिक शृंखला निर्माण झाली. या शृंखलेत अनेक आयएएस अधिकारी, नामवंत वकील, न्यायाधीश, उद्योजक, लेखक, कवी, नाटककार, नामवंत सिनेकलाकार, सिनेनिर्माते, वेगवेगळ्या शासकीय पदांवरील धोरण ठरविणारे अधिकारी, मित्रपक्षातील राजनेते अशी ही व्यापक शृंखला आहे. एकमेकांना पूरक बनून जगायचे, हा त्यांचा अलिखित नियम झाला. या सर्वांसाठी दोन शब्दप्रयोग केले जातात – ‘लुटिएन्स’ आणि ‘खान मार्केट गँग’ या दोन्ही शब्दांचे अर्थ समान आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 साली दुसर्यांदा पूर्ण बहुमताने निवडून आले. एका मुलाखतीत त्यांनी ‘खान मार्केट गँग’ असा शब्दप्रयोग केला. दिल्लीतील मध्यवर्ती भागात ‘खान मार्केट’ म्हणून एक बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत समाजातील उच्चभू्र लोक जातात. महागड्या वस्तू तेथे मिळतात. अत्यंत महागड्या हॉटेल्सना भेट देणारे ‘लुटिएन्स’ आहेत. आपल्यासारख्या सामान्य माणसाची भूक हॉटेलचे दर पाहूनच संपून जाते. पण समाजवादी ढोल पिटणार्यांना त्याचे काही नसते. वेगवेगळ्या मार्गांनी मिळविलेला पैसा ते घालवितात आणि तिथल्या रेस्टॉरंटमध्ये बसून नेहरू-गांधी परिवाराविरुद्ध जी मंडळी आहेत, त्यांच्याविरुद्ध कोणती-कोणती कथानके रचता येतील, याचा तिथे विचार केला जातो. या ‘लुटिएन्स’ना ‘खान मार्केट गँग’ नाव दिले गेले आहे.
खान मार्केटचा एक इतिहास आहे. फाळणीनंतर निर्वासित होऊन आलेल्या, सर्वस्व गमावलेल्या काही लोकांनी हे मार्केट सुरू केले. साधारणत: 1980पर्यंत सामान्य माणसाला लागणार्या वस्तू तिथे माफक दरात मिळत. खान मार्केट हे नावदेखील स्वातंत्र्यसैनिक अब्दुल गफार खान यांच्या स्मृतीसाठी ठेवण्यात आले. त्यांच्या भावाच्या नावाने ते मार्केट झाले असे काही लोकांनी म्हटले आहे. 1980नंतर तेथील जागांचे भाव आकाशाला भिडत गेले आणि तिथे आजचे खान मार्केट उभे राहिले. यातील खान या शब्दाला फार मोठा अर्थ आहे. खान मार्केट गँग असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा खान अब्दुल गफार खान असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचा एक अर्थ होतो चित्रपट सृष्टीतील भारतविरोधी खानावळ, दुसरा अर्थ होतो पाकिस्तानचे समर्थक, तिसरा अर्थ होतो अमेरिका, ब्रिटन आणि युरोपातील अनेक ट्रस्ट्सकडून पैसा घेऊन भारतविरोधी मोहीम चालविणारी मंडळी, टुकडे टुकडे गँगची मंडळी, या सर्वांसाठी वापरलेला शब्द म्हणजे खान मार्केट गँग.
ही खान मार्केट गँग म्हणजे ‘इंडिया’ आहे. या इंडियाचा ‘भारता’शी काहीही संबंध नाही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की, भारतात जगणारे लोक भारतीयत्व जगत असतात. आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपली जीवनमूल्ये, सण, उत्सव, यात्रा या सर्व माध्यमांतून हे भारतीयत्व प्रकट होते. भारत हा खेड्यात राहतो. सेक्युलॅरिझम, सोशॅलिझम, लिबरॅलिझम, अलिप्ततावाद हे शब्द त्याच्या शब्दकोशात नसतात. परग्रहावरील माणसाचे बोलणे एकवेळ तो समजून घेईल, परंतु हे शब्द म्हणजे काय ते त्याच्या डोक्यावरून जाते. खान मार्केट गँगमधली मंडळी हस्तीदंती मनोर्यात बसून नेहरू चौकटीचा राग आळवीत बसतात. तो ऐकायला कॉन्व्हेंटी आणि इंग्लिशमध्ये विचार करणारे लोक जमलेले असतात. ते स्वत:ला एलाइट म्हणवून घेतात. आपण देश चालवितो, म्हणजे देश चालविणारी जी रचना आहे तिचे सर्वेसर्वा आम्हीच आहोत, या प्रचंड घमेंडीत ते जगत असतात.
नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी शब्दप्रयोग केला ‘घमेंडिया’. 2014 साली भारताने इंडियावाल्यांच्या थोबाडात हाणली आणि पेकाटात लाथ मारून ते आडवे झाले. नरेंद्र मोदी भारताचे प्रतिनिधित्व करतात. नरेंद्र मोदी यांनी कोणता खेळ बदलला? त्यांनी इंडियावाल्यांचा खेळ बदलला आणि सनातन भारताचा खेळ सुरू केला. त्यांनी सनातन भारत जागृत केला.
सनातन भारत तसा जागा होत होता. 2014चा विचार करायचा, तर जवळजवळ 90 वर्षे या भारताच्या जागृतीचा महायज्ञ डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सुरू केला. या महायज्ञात हजारो कार्यकर्त्यांनी आपले जीवन यज्ञसमिधा मानून समर्पित केले. रामायणात हनुमंताची सुंदर कथा आहे. रामेश्वरमला रामसेना पोहोचली. रावणाने सीतेला लंकेत बंदिस्त केले आहे हे समजले. समुद्र उल्लंघून जायचे कसे याची चर्चा सुरू झाली. हनुमंत शांतपणे बसून होते. जांबुवंतांना त्याच्या जन्माची कथा माहीत होती. हनुमंत अफाट शक्तीचा साागर आहे, परंतु एका ऋषीच्या शापामुळे त्याला आपल्या शक्तीचे विस्मरण झाले आहे. शाप देणार्या ऋषीने उ:शाप दिला होता की, योग्य वेळी हनुमंताला त्याच्या शक्तीचे स्मरण करून दिले असता या सर्व सुप्त शक्ती जागृत होतील, तो क्षण आला होता.
जांबुवंताने हनुमंताची स्तुती केली आणि हनुमंताला त्याच्या अफाट शक्तीचे स्मरण करून दिले. रामदास स्वामींच्या शब्दात सांगायचे तर, ‘वाढता वाढता वाढे, मेरू मंदार धाकुटे’ अशी हनुमंताची स्थिती झाली. ही रूपकात्मक कथा आहे. समाज हा बजरंगबली असतो. आपल्या शक्तीचे त्याला विस्मरण होते. ती शक्ती जागी करावी लागते. ते कार्य सातत्याने गेले. भारत जागा करण्याच्या कार्याचे श्रेय कोणा एका व्यक्तीला देता येत नाही. हा समूहयज्ञ आहे. राजकीय क्षेत्रातील त्याचे प्रतीक नरेंद्र मोदी झाले आहेत. जागृत भारताचे ते प्रतिनिधित्व करतात.
या पुस्तकात नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजना सुरू केल्या, त्यांची नावे काय, अर्थकारणाची आकडेवारी, रस्ते रेल्वे बांधणीची आकडेवारी वगैरे काहीही दिलेले नाही. ते अतिशय महत्त्वाचे आहे हे खरे, परंतु त्याहून अधिक महत्त्वाचे कार्य म्हणजे भारताची अस्मिता जागी करून भारताला ताठ मानेने उभे करण्याचे काम आहे. हे नरेंद्र मोदी यांनी दिवसाचे सोळा-अठरा तास काम करून घडवून आणले आहे. त्यांची बरोबरी करील असा एकही राजनेता मोदींचा विरोध करणार्या पक्षात नाही. ते जातवाद, धर्मवाद, भाषावाद, खोटी कथानके, भ्रष्टाचार यातच मग्न आहेत. त्या प्रत्येकाची स्वतंत्र शक्ती आहे, ती नगण्य नाही. ही शक्ती विध्वंसक शक्ती आहे. समाजात कलह निर्माण करण्याची शक्ती मोठी आहे. अजूनही फार मोठ्या संख्येने लोक या दुष्ट शक्तीच्या मागे उभे आहेत. त्यांना हे समजत नाही की या शक्तींना बळ देऊन आपण आपल्या कृतीने आपल्या मुला-नातवांचे जीवन धोक्यात आणीत आहोत.
सनातन भारताचा एक सनातन विचार आहे. या सनातन भारतामध्ये धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष प्रत्येक युगात चालू असतो. रामायणाचा कालखंड त्रेतायुगाचा आहे, तेव्हा अधर्म शक्तीचे नेतृत्व रावण करीत होता. महाभारतातील अधर्मशक्तीचे प्रतिनिधित्व दुर्योधन करीत होता आणि आता कलियुगात या अधर्मशक्तीचे प्रतिनिधित्व खान मार्केट गँग, घमेंडिया गँग, त्यांच्यामागे उभ्या असलेल्या विविध परकीय शक्ती करीत आहेत. रावणाला जशी 10 तोंडे होती, तशी यांना 26 किंवा 27 तोंडे आहेत. धर्मशक्तीला त्या सर्वांचा पाडाव करावा लागेल. धर्म भारताचा आत्मा आहे आणि धर्म म्हणजे सदाचार, मानवता, सर्वांचा सन्मान, निसर्गाचे रक्षण, जीवसृष्टीचे संवर्धन, जलसंपत्तीचे रक्षण. दुसर्या भाषेत या सर्वांसंबंधी आपापल्या कर्तव्यधर्माचे आचरण.
या धर्माचे रक्षण झाले पाहिजे. संघर्ष हा फक्त सत्ताप्राप्तीचा नसतो. लोकशाही पद्धतीत राजसत्तेवर कोणाला बसवायचे हे जनता ठरविते आणि लोकशाहीत जनतेला झंझावाती खोटा प्रचार करून, माध्यमांचा प्रचंड उपयोग करून, परकीयांकडून जबरदस्त पैसा घेऊन भ्रमित करता येऊ शकते. आणि त्यापासून जर वाचायचे असेल, तर जनतेला साक्षर करीत राहणे हे या काळातील सर्वश्रेष्ठ कर्तव्यधर्म ठरते. एक वेळ संकष्टी चतुर्थीचा उपास केला नाही तर, कुलदेवतेची यात्रा केली नाही तर या देवता कोप पावणार नाहीत. पण निष्क्रिय राहून अधर्मशक्तीला जर बळ प्राप्त झाले, तर देवता नक्कीच रागावतील. अधर्मशक्तीचा पाडाव करीत असताना परमेश्वर अत्यंत निष्ठुर असतो. रामायणातील रावण एकटा संपत नाही, त्याच्याबरोबर त्याला साथ देणारे सर्व संपतात. महाभारतात एकटा दुर्योधन संपत नाही, दुर्योधनाला साथ देणार्या सर्वांचा संहार होतो. आपण सर्व धर्म आणि अधर्माच्या रणांगणात उभे आहोत. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत एक अभिवचन देऊन ठेवले आहे – ‘यतो धर्मस्ततो जय:।’