तपस्वी

साप्ताहिक विवेक’ प्रकाशित ‘तपस्वी’ ग्रंथ: गृहस्थी कार्यकर्त्यांच्या राष्ट्रसाधनेची अलौकिक समर्पणाची अमरगाथा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज शतकपूर्ती होऊन १०१ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. या दीर्घ, खडतर आणि गौरवशाली प्रवासात संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. हेडगेवार यांच्या विचारांची व उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची प्रेरणा घेऊन हजारो प्रचारकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले. देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन संघकार्याचा विस्तार करणाऱ्या प्रचारकांचे योगदान जितके महनीय आहे, तितकेच किंबहुना विशेष कौतुकास्पद योगदान संघाच्या ‘गृहस्थी कार्यकर्त्यांचे’ राहिले आहे. याच अलौकिक त्यागाचे आणि समर्पणाचे पुण्यदर्शन घडवणारा ‘तपस्वी’ हा ग्रंथ नुकताच ‘साप्ताहिक विवेक’तर्फे प्रकाशित झाला असून, तो प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकासाठी अत्यंत प्रेरणादायी व वंदनीय ठरत आहे.

आपला संसार, कुटुंब, नोकरी-व्यवसाय सांभाळत असतानाच राष्ट्रकार्याचा ध्यास उराशी बाळगणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. “अमृताहुनि गोड राष्ट्र आराधना” हे व्रत मानून स्वतःच्या संसाराची जबाबदारी पार पाडत संघविस्तारासाठी अहोरात्र खपणे म्हणजे खऱ्या अर्थाने ‘घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखे’ आहे.

गृहस्थाश्रमात राहूनही अलिप्त भावाने राष्ट्राची सेवा कशी करावी, याचे जिवंत उदाहरण म्हणजे या ग्रंथात नमूद केलेले कार्यकर्ते! संसारात अनेक अडचणी, आर्थिक चणचण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असतानाही त्यांनी संघकार्याला नेहमी प्रथम प्राधान्य दिले. संघकार्यालाच आपले जीवनव्रत मानून त्यांनी राष्ट्रसाधनेची ही अखंड तपस्या अविरत चालू ठेवली.

संघकार्याच्या सुरुवातीच्या काळात परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्वच आघाड्यांवर अनेक हालअपेष्टा, उपेक्षा आणि संकटांचा सामना करावा लागला. परंतु, ध्येयापासून किंचितही न ढळता या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रत्येक आव्हानाला धैर्याने तोंड दिले.

डॉ. हेडगेवार यांच्या सहवासातून निर्माण झालेली ही समर्पणाची भावना इतकी प्रबळ होती की, या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या सुखाचा वा वैयक्तिक स्वार्थाचा कधीही विचार केला नाही. त्यांच्या या निस्सीम भक्तीतून आणि त्यागातूनच आज संघवृक्षाचा महावृक्ष झाला आहे.

 ‘तपस्वी’ या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील गृहस्थी कार्यकर्त्यांच्या संघकार्याचा पट अत्यंत सुंदररीत्या उलगडण्यात आला आहे. त्यामध्ये विदर्भ तपस्वी, कोकण तपस्वी, पश्चिम महाराष्ट्र तपस्वी आणि देवगिरी तपस्वी प्रत्येक प्रांतातील या आदरणीय कार्यकर्त्यांचे जीवन म्हणजे केवळ एक प्रवास नसून ती राष्ट्रप्रेमाची, संघनिष्ठेची आणि मूल्यांची एक जिवंत पाठशाळा आहे. वेगवेगळ्या भागांत, भिन्न भौगोलिक व सामाजिक परिस्थितीत त्यांनी पेरलेले संघकार्याचे बीज आज वटवृक्षाच्या रूपात उभे आहे.

‘साप्ताहिक विवेक’ने प्रकाशित केलेला ‘तपस्वी’ हा ग्रंथ केवळ भूतकाळातील आठवणींचा संग्रह नाही, तर भावी पिढ्यांसाठी एक मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. निष्काम कर्मयोगाचे प्रत्यक्ष आचरण कसे असावे, याचा वस्तूपाठ हा ग्रंथ आपल्याला देतो.

ज्या कार्यकर्त्यांच्या त्यागावर आणि कष्टांवर आजचे राष्ट्र उभारणीचे कार्य उभे आहे, अशा सर्व ज्ञात-अज्ञात गृहस्थी तपस्वींच्या चरणी हे लेखन म्हणजे एक भावपूर्ण आणि आदरांजलीरूपी अर्घ्य ठरते. हा ग्रंथ प्रत्येक स्वयंसेवकाने, राष्ट्रप्रेमी नागरिकाने आणि तरुणाने संग्रही ठेवावा आणि अवश्य वाचावा असाच प्रेरणादायी आहे!

अमोल तपासे, नागपूर