मूल्य – २५०/-
पृष्ठसंख्या – १८४
प्रकाशक – सा. विवेक
लेखक – मिलिंद पराडकर
‘तंजावरचे मराठे ः दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ हे ‘सा. विवेक’ प्रकाशित आणि इतिहासाभ्यासक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर लिखित पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. शहाजीराजे यांच्या दूरद़ृष्टीतून महाराष्ट्र व तंजावर येथील राज्यांचा निर्मितिहास, त्याचप्रमाणे व्यंकोजीराजे व त्यांचे वंशज यांनी केलेल्या कामाचा आढावा, तंजावरकर मराठ्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पराक्रमाला कलेची व साहित्याची जोड कशी दिली याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे.
‘तंजावरचे मराठे ः दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ या पुस्तकाचे लेखन डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर यांनी केले असून हे पुस्तक ‘सा. विवेक’ प्रकाशित करत आहे. या पुस्तकात चोल घराण्यापासून व्यंकोजीराजे व त्यांच्या पुढील वंशजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतलेला आहे. शहाजीराजे यांच्या दूरद़ृष्टीतून महाराष्ट्र व तंजावर येथील राज्यांची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातून राष्ट्रीय विचार विकसित केला. त्याचा परिणाम पुढे दीर्घकाळ टिकला. त्याचप्रमाणे व्यंकोजीराजे व त्यांचे वंशज यांनी केलेले कामही खूप महत्त्वाचे असून त्याचा आढावा डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर यांनी या पुस्तकात घेतला आहे.
तंजावर म्हणताच आपणास आठवतात व्यंकोजीराजे, मराठी नाटक, मराठी वाङ्मय, भरतनाट्यम आणि किती तरी गोष्टी. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्रबंधू व्यंकोजीराजांनी कावेरीच्या खोर्यात तंजावरी मराठी राज्य स्थापन केले. तंजावरच्या मराठ्यांचा दरबार विद्वानांनी आणि कलावंतांनी नुसता गजबजून गेला होता. तंजावरचे मराठी राजे स्वत: विद्वान आणि कलासक्त होते. विद्वानांचे व कलावंतांचे आश्रयदाते होते. परिणामी मराठी वाङ्मय, मराठी नाट्य, नृत्य, कला व संगीत यात विस्मयकारक प्रगती तंजावरी होत होती. महाराष्ट्रापासून शेकडो योजने दूर मराठी संस्कृती आकार घेत होती, ही नि:संशय विस्मयचकित करणारी गोष्ट होती. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठ्यांकडे जाते. महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांचे सातत्याने एकमेकांशी संबंध आले. महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या भारताच्या जवळजवळ मध्यभागी असल्यामुळे कर्नाटक, तेलंगण या सीमावर्ती प्रांतांशी तर त्याचे संबंध आलेच, त्यामुळे एकमेकांचा प्रभाव एकमेकांवर पडला; पण त्याहीपलीकडे जाऊन तमिळनाडूमध्ये तंजावरी मराठी सत्ता स्थापन झाली. महाराष्ट्राचे तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवाह तिथल्या संस्कृतीत बेमालूमपणे समाविष्ट झाले, त्यामुळे वेगळाच असा सांस्कृतिक संगम आपणास तंजावरात पाहावयास मिळतो. तंजावर महाराष्ट्रापासून शेकडो योजने दूर असूनही मराठी संस्कृती तेथे पोहोचली.
तंजावरला ‘पूर्वेचे व्हेनिस’ किंवा ‘दक्षिणेचे एडन’ म्हणतात. ती एक यक्षनगरी आहे. जुन्या कागदपत्रात तंजावरचे उल्लेख तंजावूर, चंदावर, चंजावर असे आढळतात. कावेरीचे सुपीक खोरे, सुपीक जमीन, आल्हाददायक हवा, उंच उंच नारळाची झाडे असलेले हे संस्थान फार लहान होते. भारताच्या नकाशात ते एक टिपूस भासते; परंतु या चिमुकल्या संस्थानामुळे महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाला प्रतिभाशाली इतिहासाची जोड लाभली.
तंजावरचे नायक राजे व मदुराईचे नायक राजे यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी आदिलशहाच्या वतीने व्यंकोजीराजे तंजावरी गेले, स्वपराक्रमाने त्यांनी तंजावर जिंकले (इ.स. 1675), तेव्हापासून ते तंजावरचे राज्य खालसा होईपर्यंत (इ.स. 1855) तंजावरास मराठी सत्ता होती. इसवी सन 1676 मध्ये व्यंकोजीराजांनी आपली राजधानी बंगळुरूहून तंजावरला हलवली. तंजावरास भोसले राजवट एकशे ऐंशी वर्षे होती. या काळात एकूण बारा राजे होऊन गेले. व्यंकोजीराजे, शहाजीराजे, सर्फोजीराजे पहिले, तुळजाजीराजे पहिले, व्यंकोजीराजे दुसरे, सुजानबाई, सवाई शहाजी (काटराजा), प्रतापसिंह, तुळजाजीराजे दुसरे, अमरसिंह, सर्फोजीराजे दुसरे, शिवाजीराजे दुसरे. डलहौसीने हे राज्य खालसा करेपर्यंत तंजावरकर मराठ्यांनी मूळ मातीशी असलेले आपले नाते कायम राखले आणि महाराष्ट्रातील मराठ्यांनीही या आपल्या दूरस्थ बांधवांची सदैव आठवण ठेवलेली दिसते. व्यंकोजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज संघर्ष वगळता या दोन घराण्यांत सतत सहकार्याचे, प्रेमाचे संबंध आलेले दिसतात. त्यामुळे तंजावरच्या समाजजीवनावर मराठी संस्कृतीचा प्रभाव पडला व मराठी संस्कृती तेथे रुजली, ही विस्मयचकित करणारी गोष्ट होती. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठ्यांकडे जाते.
तंजावरी मराठीचा प्रवेश – तंजावरी मराठ्यांचा व परिणामी मराठी भाषेचा प्रवेश ही सांस्कृतिकदृष्ट्या युगप्रवर्तक घटना म्हणावयास हवी. युगप्रवर्तक यासाठी की, दोन संस्कृतींचा फार सुंदर मिलाफ इथे झाला आहे. कावेरी नदीने या राज्याला भौगोलिक सुपीकता तर दिलीच, शिवाय तंजावरचे सांस्कृतिक जीवन फुलले कावेरीच्या खोर्यात. चोल, पांड्य, नायक या राज्यकर्त्यांच्या काळापासूनच तंजावरास उच्च अभिरुची असलेला वारसा लाभला होता. तंजावरकर मराठ्यांनी तो वारसा नुसताच जतन केला नाही, तर तो वारसा प्रवाही ठेवला. मराठी वाङ्मय, मराठी भाषा, मराठी नाट्य, मराठी रंगभूमी यांचा विकास झाला. नृत्याचे पदझंकार उमटले, संगीताच्या मैफली झडल्या.
राज्यकर्त्यांना हे करणे जमले, कारण हा भाग मुस्लीम आक्रमणापासून दूर राहिला, त्याचबरोबर शहाजी महाराजांचे बंगळुरूला वास्तव्य, मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामात राजारामांचे जिंजीला प्रयाण, तंजावरी व्यंकोजीराजांची राज्यस्थापना यामुळे आपले विश्वास, देवी-देवता, श्रद्धा, परंपरा, सण यासह अनेक मराठी कुटुंबे तिकडे गेली. शहाजी महाराजांबरोबर सोनार, डोंबारी, सैनिक, शेतकरी व विद्वान तिकडे स्थायिक झाले. राजारामांबरोबर पाटील, कुणबी, चांभार, कुंभार, परीट, न्हावी, कोळी दक्षिणेत गेले. तसेच महाराष्ट्रात दुष्काळ पडला, तेव्हा अनेक कुटुंबे तंजावरास स्थलांतरित झाली. व्यंकोजीराजांनी आपली राजधानी बंगळुरूहून तंजावरला हलवली, तेव्हा त्यांच्या बंगळुरूच्या दरबारातील विद्वान मंडळी व ज्येष्ठ अधिकारी तंजावरास स्थिर झाले. ‘महंते महंते करावे’ या समर्थांच्या उक्तीप्रमाणे समर्थ संप्रदाय तंजावरी पोहोचला. तंजावरकर भोसल्यांनी आपल्या कुलवधू महाराष्ट्रातील शहाण्णव कुळी मराठी समाजाकडून निवडल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून मराठी भाषा, मराठी वाङ्मय, मराठी नाट्य, संतसाहित्य व मराठी संस्कृती तंजावरास पोहोचली. व्यंकोजीराजांच्या काळापासून मराठी मोडीला राजभाषेचे स्थान मिळाले. सरकारी कामकाज, हिशेब सर्व मोडीत लिहिले गेले. 17व्या शतकात मराठी रामेश्वरपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख महाभारतकार माधवस्वामी पुत्र माधवसुत यांच्या ‘हरिवंश’ या ग्रंथात अध्याय दोनमध्ये आहे. वेदान्त, मीमांसा बखरी, लावणी आख्यानकाव्य, शब्दकोश, लावणी, पद, ओव्या, डोहाळे, आरती, नाट्य हे वाङ्मयाचे सर्व प्रकार तंजावरी रचले गेले. लावणी हा अस्सल मराठी प्रकार तंजावरात रूढ होता. सर्फोजीराजे दुसरे यांनी त्रिस्थळी यात्रेच्या लावण्या रचल्या, शृंगारिक लावण्याही रचल्या गेल्या. समर्थ संप्रदायी मठातून प्रचंड वाङ्मय आहे. मराठी भाषेतला आशिया खंडातील प्रचंड मोठा मराठी भाषेतील शिलालेख तंजावरी कोरला.
बृहदीश्वर मंदिरातील शिलालेख – सर्फोजीराजे दुसरे यांच्या आज्ञेवरून त्यांचे निजसेवक काश्यपगोत्री बाबूराव चिटणीस यांनी लिहिला. या शिलालेखाचा काळ यातच नमूद केला आहे – ‘शालिवाहन शके 1725 रुधिरोद्धारी संवत्सर मार्गशीर्ष वद्य अमावस्या समवार, इंग्रजी सन 1803 डिसेंबरला पूर्ण झाला.’ हा शिलालेख बृहदीश्वर मंदिरात भिंतींवर कोरला आहे. कोरीव लेखातील हे एक आश्चर्य म्हणावे लागेल. मराठी भूमीपासून शेकडो योजने दूर तंजावरच्या व महाराष्ट्रातील मराठ्यांचा इतिहास सांगणारा हा प्रचंड कोरीव लेख, तोही मराठी भाषेत व देवनागरी लिपीत हे एक आश्चर्य होय. बृहदीश्वर मंदिरात बाहेरच्या बाजूस भिंतीवर तमिळ भाषेत चोल राजांचा इतिहास शिलालिखित केला आहे. या शिलालेखामुळेच मराठी राज्याचा इतिहास कोरण्याची कल्पना सुचली असावी. भोसले राजवंश, शहाजी महाराजांचे कर्तृत्व, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, मराठ्यांच्या दक्षिणेतील हालचाली, तंजावरचा राजकीय इतिहास – विशेषत: तंजावरातील तत्कालीन समाज व संस्कृती यांचे दर्शन प्रस्तुत शिलालेखात आहे. विद्याव्यासंगी सर्फोजीराजे दुसरे यांनी आपल्या कानावर आलेला व आपणास अनुभवास आलेला इतिहास लिहून ठेवण्याची आज्ञा केली. अधिकार्यांनी या राज्याचा शंभर वर्षांचा इतिहास शिलालिखित केला. याचे स्वरूप बखरीचे असल्याने बखरीतील सर्व गुणदोष यात आहेत. कथा, दंतकथा यांचे बेमालूम मिश्रण यात आहे; शिवाय दैवी चमत्कार, अद्भुत हकीकती, पाल्हाळ, अतिशयोक्तीपूर्ण वर्णने व काही अंशी भाषेचे सौष्ठव जाणवते.
मराठी बोलीभाषा – मराठी बोलीभाषेचे वेगळे स्वरूप तंजावरास आढळते. मराठी भाषेशी सतत संपर्क न आल्याने तंजावरी मराठी बोलीभाषेवर तमिळ, कन्नड भाषांचा प्रभाव पाहावयास मिळतो. बृहदीश्वरच्या शिलालेखात व बोलीभाषेत क्रियापदाची रूपे प्रथमपुरुषी एकवचनी आहेत – उदा. केली, पाठविलो अशी कन्नड वळणाची येतात. येथील मराठी भाषेवर तमिळ भाषेचे संस्कार झालेले आढळतात. तेथील लोक मराठी बोलतात; पण उच्चार तमिळ पद्धतीचे आहेत. ज्ञानेश्वरकालीन मराठी बोलीभाषा तेथे आजही बोलली जाते. उदा. कोनिनिघणे (बाळंत होणे), दिवा रात कर (दिवा मालव), चिमणी बहीण (लहान बहीण). अर्थात भाषेवर प्रादेशिकतेचा परिणाम होणे स्वाभाविक असते. शिलालेखात यदलशा (आदिलशहा) फौजदार हा फार्सी शब्द आलेला आहे. इंग्रजांचे तंजावरावर प्रभुत्व वाढल्यावर इंग्लिश भाषेचाही वापर झालेला दिसतो. शिलालेखात त्रेटी (ीींशरीूं), कुंपनी (लेारिपू), लिफी (लिपी) असे शब्द आले आहेत.
देवी-देवता व सण – देवी-देवता व सण यावरही मराठी संस्कृतीचा प्रभाव आहे. राजघराण्याचे कुलदैवत शिव आहे. त्यांच्या देवघरात तुळजाभवानीचा टाक आहे. चैत्रगौरीचे हळदी-कुंकू, त्यानिमित्ताने कैरीची डाळ व कैरीचे पन्हे आजही समर्थ संप्रदायी मठातून दिले जाते. संक्रांतीला जावयाला हलवा घालून चांदीची वाटी देण्याची पद्धती आहे. विठ्ठल, राम, हनुमान, खंडोबा यांची पूजा केली जात असे. मराठी सण, मराठी भाषा यांबरोबरच मराठी नाट्यसृष्टी तंजावरात विकसित झाली.
मराठी नाट्यसृष्टी – दोनशे वर्षांच्या कालखंडात तंजावरच्या भोसले राजांनी मराठी भाषेत पन्नासहून अधिक नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टीच्या मंदिरात आपली सेवा रुजू केली. इसवी सन 1676 ते 1855 या जवळजवळ दोनशे वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रापासून शेकडो योजने दूर तंजावरात शाहराजांच्या काळात मराठी नाटकाची आणि मराठी रंगभूमीची सुरुवात व विकास झाला, तेव्हापासून 19व्या शतकापर्यंत तंजावरच्या मराठी राज्यकर्त्यांनी मराठी रंगभूमीची अव्याहत सेवा केली. विष्णुदास भाव्यांच्या ‘सीता स्वयंवर’ (इसवी सन 1843) या नाटकापासून मराठी रंगभूमीची सुरुवात झाली, असे मानले जाते; परंतु इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांना तंजावर येथील रामदासी मठात शाहराजा यांचे ‘लक्ष्मीनारायणकल्याण’ या नाटकाचे हस्तलिखित सापडले आणि मराठी नाटकाच्या आद्यत्वाचा मान तंजावरकडे गेला (1690). राज्यकर्त्यांनी व त्यांच्या दरबारी प्रतिभावंतांनी नाट्यभूमीची अव्याहत सेवा केली. ही सर्व नाटके नृत्य-नाट्य-संगीतमय आहेत. धार्मिक उत्सवप्रसंगी या नाटकांचे प्रयोग केले जात. ही सर्व नाटके यक्षगान पद्धतीची आहेत. मंदिरात व संगीत महालात त्याचे प्रयोग होत.
संगीत महाल – भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात नाट्यगृहाची जी कल्पना मांडली, त्या परंपरेत हे नाट्यगृह बसत नाही; परंतु तंजावरकरांच्या नाट्यरसिकतेची कल्पना देण्यास पुरेसे आहे. त्या काळाची गरज भागवणारे ते नाट्यगृह होते. नायक राजवटीत हा महाल उभारला. संगीत महालात प्रेक्षकांना बसायला मोठी खोली होती. मोठा रंगमंच पाहावयास मिळतो. त्या काळात आजच्यासारखे लाऊडस्पीकर नव्हते. रंगमंचासमोर पाण्याचा मोठा हौद होता. त्या पाण्याच्या लहरीबरोबर पात्रांचे आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत. सर्वच राज्यकर्त्यांनी मराठी नाट्यरचना केल्या. सर्फोजीराजे दुसरे यांनी नाट्यशास्त्राला अनुसरून तीन-अंकी, पाच-अंकी नाट्यरचना केल्या. मराठीबरोबरच तेलुगू, तमिळ, संस्कृत, हिंदी इत्यादी भाषांतही रचना झाल्या. काही नाटकांच्या प्रती तेलुगू, तमिळ व देवनागरी लिपीत आहेत. मराठी नाटकात भाषा मराठी व लिपी तमिळ किंवा तेलुगू आहे. कारण रंगकर्मी मराठी भाषक असतीलच असे नाही. नाटकांचे प्रेक्षक मंडळी बहुभाषक असत आणि त्यांना सर्वांना ही नाटके समजत, कारण कथावस्तू पौराणिक असून नृत्यगान पद्धतीने सादर होत. नृत्याचे हावभाव त्यांना सवयीने समजत. नाट्याबरोबरच नृत्याचे पदझंकार उमटले व संगीताच्या मैफली झडल्या.
नृत्य व संगीत – राज्यकर्ते विद्वान, प्रतिभावान व कलाप्रेमी होते. त्यामुळे पूर्वसुरींपासून- चोल, नायक यांच्या काळापासून चालत आलेला वारसा मराठी राज्यकर्त्यांनी चालू ठेवला. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तंजावरची देणगी आहे. मराठी राज्यकर्त्यांनी नृत्याची परंपरा देवप्रांगणापासून ते राजप्रांगणापर्यंत नेऊन पोहोचवली. ही परंपरा देवदासींनी टिकवली. प्रसिद्ध नृत्यपंडित चिनेय्या, पोन्नेया व शिवानंद वेदिवेलु हे सर्फोजीराजे दुसरे यांच्या दरबारी होते.
संगीत – कर्नाटक संगीत हे आद्य संगीत मानले जाते. तंजावरच्या सर्वच मराठी राज्यकर्त्यांनी संगीताची अजोड सेवा केली. सर्फोजीराजे दुसरे यांचा काळ संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. प्रसिद्ध संगीतकार त्यागराज, श्यामशास्त्री व मुत्थूस्वामी दीक्षितार हे तिघेही सर्फोजी दुसरे यांच्या दरबारी संगीतकार होते. या तिघांनी कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा प्राप्त करून दिला. आजही 6 जानेवारीस तिरुवारुर येथे त्यागराजांच्या स्मरणार्थ संगीत मैफल आयोजित केली जाते. प्रसिद्ध संगीतकार तेथे आपली सेवा रुजू करतात आणि तो बहुमान समजला जातो. वेकोबाराव, सुंदरराव हे शिवाजीराजे दुसरे यांचे दरबारी होते. सर्फोजीराजे दुसरे यांनी हिंदुस्थानी संगीत इंग्लिश नोटेशनमध्ये बसवून घेतले. लॉर्ड जेम्स, जोसेफ फ्रान्सिस त्याच्या दरबारात होते. सर्फोजीराजांनी भारतीयांना पाश्चिमात्य संगीत शिकवण्यासाठी तंजावर बँडची स्थापना केली. संगीताच्या विकासाला कीर्तनानेही हातभार लावला.
कीर्तन – कीर्तन हा खास महाराष्ट्रीय प्रकार तंजावरी समर्थ संप्रदायामार्फत आला. समर्थ संप्रदायाने महाराष्ट्रीय संस्कृती तिकडे नेण्याचे फार मोठे कार्य केले. समर्थांचे तीन शिष्य भीमस्वामी, अनंतमौनी व राघवस्वामी यांनी ‘महंते महंते करावे’ या समर्थांच्या शिकवणीप्रमाणे तंजावरात अनेक शिष्य तयार केले, मठाची स्थापना केली व त्यातून कीर्तन परंपरा तंजावरात रुजली. कीर्तनाचा प्रभाव पडेपर्यंत हरिकथा या पठण व पुराणातून सांगितल्या जात. यास तमिळ भाषेत ‘कथाकालक्षेपम’ म्हणतात. कीर्तनाच्या प्रसारानंतर संगीत, ताल, सूर, चिपळ्या, टाळ, हार्मोनियम यांच्या साथीने या हरिकथा सादर होऊ लागल्या. महाराष्ट्रीय संगीतातील साकी, दिंडी, अभंग, ओवी आजही तेथे लोकप्रिय आहे. देसडी ताल महाराष्ट्राच्या प्रभावामुळे परिचित झाला. कीर्तनकार रामचंद्रबुवा मोरगावकर आपले पुत्र विष्णुबुवा यांच्यासह 17व्या शतकात तंजावरात बहुधा चातुर्मासात आले असावेत. मराठी कीर्तनात तमिळ रचना, तसेच शाहराजांची पदे गायली जात. मराठी कीर्तन आजही तंजावरी रामदासी मठात पाहावयास मिळते. ही सर्व वाङ्मयसंपदा सुरक्षित ठेवण्यासाठी सरस्वती महाल ग्रंथालय म्हणून नावारूपाला आले.
सरस्वती महाल – सरस्वती महाल हा नायक राजांच्या काळात बांधला गेला, नावारूपाला आला. सर्फोजीराजे दुसरे यांच्या काळात उत्कर्षाला पोहोचला. आज तो महाल ग्रंथालय म्हणून प्रसिद्ध आहे. अभ्यासकांसाठी ते तीर्थक्षेत्र आहे. कमरेला उत्तरीय, अंगावर पायघोळ झगा आणि मस्तकावर मराठेशाही पगडी असलेला सर्फोजीराजांचा शुभ्र संगमरवरी पुतळा या ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारासमोर आहे. पुतळ्याच्या पायथ्याशी गर्जणार्या सिंहाचे मुख आहे. मात्र त्यांच्या हातात तलवार नाही, तर विद्यादेवी सरस्वतीला नमस्कारासाठी जोडलेले हात आहेत. राज्यकर्त्यांची अभिजात रसिकता, बुद्धिमत्ता आणि कल्पकता याचे मूर्तिमंत स्मारक म्हणजे सरस्वती महाल. शिल्पकला, चित्रकला, वाङ्मय, हस्तलिखित, मोडी कागदपत्रांचे रुमाल, ताडपत्रावर लिहिलेली नाटके हे या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य आहे. पोथ्या, हस्तलिखित वह्या यावर चित्रकारांनी नैसर्गिक रंगांनी काढलेली चित्रे विलक्षण आकर्षित करणारी आहेत. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी त्यावर काढलेल्या चित्रांचे रंग आजही टवटवीत आहेत. गजशास्त्र, वैद्यकशास्त्र, युद्धशास्त्र, क्रीडाशास्त्र यांची बांधणी, प्रत्येक पानावर विलोभनीय चित्रे यामुळे हे ग्रंथ नुसतेच वाचनीय नाहीत, तर प्रेक्षणीयही आहेत. सर्फोजीराजे दुसरे हे बहुविद कोविद होते. त्यांनी तीर्थयात्रेवरून परत येताना ग्रंथांचा मोठा संग्रह आणला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे ग्रंथालय नावारूपाला आले. सर्फोजीराजे दुसरे यांनी केलेला चित्रांचा व छायाचित्रांचा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रंंथ आहे, त्यात डावीकडून उजवीकडे वाचल्यास रामायण व उजवीकडून डावीकडे वाचल्यास महाभारत होते.
आज तंजावर येथे मराठी माणसांनी बांधलेले किल्ले, इमारती मिळणार नाहीत; परंतु कलेचा, वाङ्मयाचा आणि संस्कृतीचा त्यांनी ठेवलेला वारसा आजही कोणाही व्यक्तीला आकृष्ट करण्याच्या स्वरूपात आहे. तंजावरकर मराठ्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पराक्रमाला कलेची व साहित्याची जोड दिली. त्यामुळेच तंजावरच्या मराठी राज्याचा अभ्यास केल्याशिवाय मराठेशाहीचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
– डॉ. अरुणचंद्र शंकरराव पाठक, ज्येष्ठ संशोधक